छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेने शहरातील दहा महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.१७) आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेपूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मनपा प्रशासनाच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा अतिक्रमणधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर यापूर्वी जून ते ऑगस्ट या कालावधीत मनपाने मोठी कारवाई केली होती. बीड बायपास, पैठण रोड, जालना रोड, जळगाव रोड, दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंट व्हीआयपी रोड आणि नगरनाका ते शक्तीधाम मंदिरपर्यंत अशा सहा प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवर मोजणी, मार्किंग आणि पाडकाम करण्यात आले होते. या मोहिमेत सुमारे साडेपाच हजार अतिक्रमणे हटवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत पालकमंत्री, खासदार आणि आमदारांनी रस्ते रुंदीकरणाला पुन्हा एकमताने पाठिंबा दिला होता.
यानंतर मनपा प्रशासनाने आणखी आठ रस्त्यांवर टोटल स्टेशन सर्व्हेक्षण करून नवीन मार्किंग केले. मात्र काही कारणास्तव पुढील कारवाई थांबवावी लागली. दरम्यान, मनपाने रस्त्यांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २ हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. पण निधी मिळण्याची शक्यता कमी असल्याच्या संकेतांनंतर कन्स्ट्रक्शन टीडीआरचा मार्ग निवडण्यात आला. त्यानंतर एका खाजगी संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये सुमारे ३५०० कोटींची गरज असल्याचे स्पष्ट झाले.
आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, अधिकारी संजय सुरडकर, सविता सोनवणे तसेच झोन कार्यालयांचे सहायक आयुक्त उपस्थित होते. बैठकीत दहा रस्त्यांवरील अतिक्रमण हटावासाठी रितसर प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये सर्वेक्षण, मार्किंग, तसेच बाधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावणे यांचा समावेश आहे.
कारवाई होणारे दहा प्रमुख रस्ते
पडेगाव ते गोल्फ कोर्स, नगरनाका ते शक्तीधाम मंदिर, कांचनवाडी ते लॉ विद्यापीठ, रेणूका माता कमान ते उमरीकर लॉन्स, हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी लॉन्स, सेव्हन हिल चौक ते भाजीवालीबाई पुतळा, बाबा पेट्रोल पंप ते जळगाव टी पॉइंट (व्हीआयपी रोड), चंपाचौक ते जालना रोड, क्रांती चौक ते पैठण गेट आणि हर्सूल कारागृह ते अंबरहिल.
पहिल्या टप्प्यात हर्सूल, पडेगाव–मिटमिटा–गोल्फ कोर्स रस्ता आणि पैठण गेट–क्रांती चौक या तीन रस्त्यांवर तातडीने कारवाई होणार आहे. या तिन्ही ठिकाणचे सर्वेक्षण व नोटीस प्रक्रिया पूर्ण झाली असून आठवड्याभरात पाडकाम सुरू होणार असल्याची माहिती संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*