छत्रपती संभाजीनगर : शहरात रविवारी पार पडलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) दरम्यान महिला परीक्षार्थ्यांना अत्यंत त्रासदायक आणि संतापजनक परिस्थितीला सामोरे जावे लागले. परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी महिलांना मंगळसूत्र, नाकातील फुले तसेच कानातील दागिने काढण्याची सक्ती करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. धातूचे कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई असल्याचे कारण देत केंद्र प्रशासनाने ही कडक तपासणी राबवली होती.

सकाळी ७ वाजता रिपोर्टिंग वेळ असताना प्रत्येक परीक्षार्थ्याची कसून झडती घेण्यात येत होती. “कोणतेही मेटल साहित्य सोबत नेऊ नका,” अशा सूचना गेटवरच देण्यात येत होत्या. मात्र, अनेक महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र आणि धार्मिक भावनांशी जोडलेले दागिने काढण्यास भाग पाडल्याने संताप व्यक्त करण्यात आला. काही परीक्षा केंद्रांवर दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे महिलांची मोठी गैरसोय झाली.

अनेक महिलांना आपले दागिने सोबत आलेल्या नातेवाईकांकडे सोपवावे लागले, तर काही महिला एकट्याच आल्याने त्यांची मोठी अडचण झाली. काहींनी दागिने बाहेर झाडाझुडपात किंवा बॅगमध्ये लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही चित्र पाहायला मिळाले. या प्रकारामुळे परीक्षा केंद्राबाहेर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महिला परीक्षार्थ्यांनी सांगितले की, सुरक्षा तपासणी आवश्यक असली तरी धार्मिक आणि सामाजिक भावनांचा विचार न करता अशी सक्ती करणे चुकीचे आहे. प्रशासनाने आधीच स्पष्ट सूचना द्यायला हव्या होत्या किंवा दागिने ठेवण्यासाठी सुरक्षित लॉकरची व्यवस्था करायला हवी होती.

राज्यभरात आज सीटीईटी परीक्षा पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत महिला परीक्षार्थ्यांना होणारा मानसिक त्रास थांबवावा, अशी मागणी केली आहे. भविष्यात अशा परीक्षा अधिक संवेदनशीलपणे आणि योग्य नियोजनाने पार पाडाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

561 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क