छत्रपती संभाजीनगर : शहरातील हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराने पत्नीसमवेत अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. तब्बल तासभर चाललेल्या या गोंधळामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ मुरलीधर गिरी (२७) व अनिता सोमनाथ गिरी (२५, दोघे मूळ रा. चांदानगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, सध्या विजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत. वाहतूक शाखा सिडको येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार रावसाहेब धन्नू पचलोरे (४७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पचलोरे हे हायकोर्ट सिग्नल येथे कर्तव्य बजावत असताना त्यांचे सहकारी अंमलदार हाताळकर काही वेळासाठी जेवणासाठी गेले होते. दरम्यान, बीट मार्शल अंमलदार संतोष खरात हे मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत होते. त्यावेळी एमएच १७, सीक्यू ६७४२ क्रमांकाची दुचाकी दुभाजकास खेटून धोकादायक पद्धतीने चालवताना आढळली. अंमलदार खरात यांनी संबंधित दुचाकीस्वारास थांबविले असता त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. तो मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा संशय पोलिसांना आला.
त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकच आक्रमक झाला. नाव सांगण्यास नकार देत शिवीगाळ करत “दोन दिवसांत पाहून घेतो” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने पत्नीला बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी मिळून पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. याचवेळी दुचाकीस्वाराने हवालदार पचलोरे यांच्या कानशिलात लगावत मारहाण केली.
घटनेनंतर संबंधित व्यक्ती रस्त्यावर झोपून वाहतुकीस अडथळा निर्माण करू लागला. त्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षास वायरलेसद्वारे माहिती देण्यात आली. सिडको वाहतूक पोलिस व दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले. रिक्षा स्टँडवरील चालक व काही नागरिकांनी समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*