छत्रपती संभाजीनगर : शहरात कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत आहेत का? पोलिसांवरच हात उगारण्याचे धाडस कुणाला येते कसे? अशा प्रश्नांना वाचा फोडणारी धक्कादायक घटना सिडको एन-११ परिसरात घडली. दारूच्या नशेत रिक्षा चालवत अपघात करणाऱ्या चालकाने केवळ अरेरावीच केली नाही, तर पोलिस ठाण्याकडे नेत असताना पोलीस अंमलदारालाच बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याच्या आई-वडिलांनीही पोलिसांवर झडप घालत गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
पोलीस अंमलदार विनोद गजानन खरात (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते डायल ११२ या आपत्कालीन सेवेत कार्यरत होते. त्यावेळी तुषार नावाच्या युवकाने फोन करून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या कारला एका रिक्षाने धडक दिली असून चालक दारूच्या नशेत अरेरावी करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार अंमलदार खरात व अंमलदार कवाळे तातडीने सिडको एन-११ सुदर्शननगर येथील साई मैदानाजवळ पोहोचले.
तेथे शुभम रणयेवले हा रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत आढळला. त्याच्या रिक्षाने तुषार यांच्या वाहनाला मागून धडक दिली होती. अपघातानंतर तो तुषार व त्यांच्या वहिणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात घेतली आणि शुभमला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले.
मात्र, पोलिस ठाण्याकडे जात असतानाच परिस्थिती चिघळली. शुभमने पुन्हा शिवीगाळ सुरू केली. पोलिसांनी त्याला शांत बसण्यास सांगितल्यावर त्याची आई संतापली. तिने अंमलदार खरात यांचा हात पकडून “माझ्या मुलाला काही बोलू नका” अशी धमकी दिली. त्यानंतर शुभमने रिक्षातच अंमलदार खरात यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या वर्दीची नेमप्लेट, लाईनयार्ड आणि शर्टाची बटणे तोडण्यात आली.
हल्ल्यादरम्यान शुभमचे वडील राजेंद्र रणयेवले यांनीही हस्तक्षेप करत अंमलदारांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तुषार यांनी राजेंद्र यांना दूर ओढले. दरम्यान, अतिरिक्त पोलिस मदत बोलावण्यात आली आणि तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
शुभम रणयेवले व त्याचे आई-वडील (रा. नवजीवन कॉलनी, एन-११, हडको) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान नराळे करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*