वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. शनिवारी (दि. २१) राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कचरू बाबुराव धुरट (वय ६५, रा. करंजगाव, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वैजापूर परिसरात नियमित कोंबिंग ऑपरेशन राबवत होते. याच दरम्यान करंजगाव शिवारातील गट क्रमांक १३२ मध्ये अफूची बेकायदेशीर लागवड सुरू असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने तातडीने संबंधित शेतावर छापा टाकला. तपासणीदरम्यान शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळून आली.
पोलिसांनी सुमारे १८० किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्यांची बाजारातील अंदाजे किंमत २७ लाख ९ हजार २२५ रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास वैजापूर पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक पवन इंगळे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात संतोष मीसळे, कासम शेख, प्रमोद पाटील, सुनील गोरे, विष्णू गायकवाड, सचिन सोनार, रवी लोखंडे, अंगत तिडके, अशोक वाघ, राहुल गायकवाड, सचिन राठोड, अनिल काळे, सनी खरात, कविता पवार, विठ्ठल डोके, गोपाळ पाटील, शिवाजी मगर आदींचा सहभाग होता. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*