छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सभापतीपदाच्या निवडीतही आपले राजकीय वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे. अचूक संख्याबळ आणि प्रभावी रणनीतीच्या जोरावर भाजपने चारही सभापतीपदे बिनविरोध मिळवत जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता अधिक बळकट केली. विरोधकांकडून उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने ही निवडणूक औपचारिक ठरली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदी अनिता मोटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मीनाक्षी पवार, समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी बालाजी सोनटक्के, तर अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतीपदी सचिन गरड यांची निवड निश्चित झाली. दुपारी २ नंतर पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले.
महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गीतांजली पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे दोघांनीही ऐनवेळी अर्ज दाखल करण्याचे टाळले. शिवसेना व उबाठा गटाचे सदस्य गैरहजर राहिल्याने भाजपचा मार्ग आणखी सुकर झाला.
भाजपने महिला नेतृत्वाला चालना देत मीनाक्षी पवार व अनिता मोटे यांना संधी दिली, तर महायुतीचा समन्वय साधत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडील बालाजी सोनटक्के यांनाही स्थान दिले. अपक्ष असूनही भाजप समर्थित सचिन गरड यांना सभापतीपद देत पक्षाने राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवली.
६३ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपकडे २३ जागा असून, शिवसेना २१, उबाठा ९, राष्ट्रवादी (अजित पवार) ४, इतर पक्ष व अपक्ष मिळून उर्वरित जागा आहेत. अपक्षांचा पाठिंबा मिळवत भाजपने विरोधकांचे सर्व डाव उधळून लावत सत्ता कायम राखली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*