छत्रपती संभाजीनगर : घराचा स्लॅब टाकताना मिक्सर मशीनसोबतच्या क्रेनचा महावितरणच्या उघड्या तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मिसारवाडीत रविवारी (दि. १२) दुपारी सुमारे ४ वाजता घडली. या घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, ठेकेदार व घरमालक घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

विशाल अंकुश चव्हाण (२६, रा. जयभवानीनगर) व मलकन बापू जाधव (३५, रा. मुकुंदवाडी) अशी मृतांची नावे असून, पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक निवृत्ती गायके, सहायक उपनिरीक्षक सुभाष शेवाळे व बीट अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मिसारवाडीत एका दुमजली घराचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. अरुंद जागेमुळे मिक्सर मशीन उघड्या वीजतारांच्या अगदी जवळ उभे करण्यात आले होते. मिक्सरमधील साहित्य क्रेनच्या साहाय्याने वर नेत असताना क्रेनचा भाग वीजतारांना लागला. यावेळी जवळ उभ्या असलेल्या विशाल व मलकन यांना जोरदार विजेचा धक्का बसून ते जागीच कोसळले.

सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना तारांपासून दूर करून दवाखान्यात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर ठेकेदार व घरमालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांनी महावितरणने उघड्या तारांचे तत्काळ ऑडिट करावे, अशी मागणी केली आहे.

विशाल चव्हाण हा कुटुंबाचा आधार होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,310 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क