छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाच्या हलक्या शिडकाव्यानंतर शहरातील तापमानात पुन्हा झपाट्याने वाढ होत असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. रविवारी शहराचे कमाल तापमान तब्बल ४०.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत यंदाच्या हंगामातील उच्चांक नोंदवण्यात आला. शनिवारी हेच तापमान ३९.४ अंश होते. त्यामुळे केवळ एका दिवसात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उन्हाचा तीव्रपणा अधिक जाणवू लागला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत होती. मार्च अखेरीस शहराचा पारा ३८.५ अंश सेल्सियसपर्यंत गेला होता. १ एप्रिल रोजीही तापमान ३८ अंशांवर कायम राहिल्याने लवकरच चाळीशी ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ती शक्यता आता खरी ठरली असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे.

गेल्या आठवड्यापासून सूर्यदेव अधिक तळपू लागल्याने उष्णतेचा कडाका वाढत चालला आहे. गुरुवारी कमाल तापमान ३५.६ अंशांवर होते, तर शुक्रवारी ते ३७.९ अंशांपर्यंत वाढले. त्यानंतर शनिवारी ३९.४ आणि रविवारी थेट ४०.४ अंशांपर्यंत झेप घेतली. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसत असून नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत.

किमान तापमानातही वाढ झाल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी किमान तापमान २३.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. दिवसाबरोबरच रात्रीही उष्णतेची झळ कायम असल्याने नागरिकांना दिलासा मिळत नाही. उष्माघाताचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

594 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क