छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख चौक, रस्ते, तसेच विविध भाग आकर्षक रोषणाई, बॅनर आणि सजावटीने उजळून निघाले असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. भीमसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून मोठ्या संख्येने नागरिक मिरवणुकांमध्ये सहभागी होत आहेत.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात सुमारे १ हजार ५२७ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जलद कृती दल (QRT), दंगल नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्स आणि बीट मार्शल सतत गस्त घालणार आहेत. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे.
गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ विशेष कार्यरत असणार आहे. हे पथक मिरवणुकांमध्ये फिरून छेडछाड किंवा अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी सतत दक्ष राहणार आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षित वातावरणात जयंतीत सहभागी होता येणार आहे.
या बंदोबस्तात ३४ पोलीस निरीक्षक, १०२ सहायक व उपनिरीक्षक, १,२३६ पुरुष पोलीस अंमलदार आणि १९१ महिला अंमलदारांचा समावेश आहे. पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शांततेत आणि अनुशासनात जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*