छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंभेफळ येथे रविवारी (ता. १२) रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सर्पदंशामुळे अवघ्या दोन वर्षांच्या शंभू ज्ञानेश्वर दांडगे (रा. वरूड, ह.मु. कुंभेफळ) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दांडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंभू घरातील जिन्यात खेळत होता. याच वेळी तेथे बसलेल्या कोब्रा जातीच्या सापावर त्याचा नकळत पाय पडला. अचानक झालेल्या या हालचालीमुळे सापाने शंभूच्या उजव्या पायाला दंश केला. दंश होताच शंभू जोरजोरात रडू लागला. त्याची आई धावत आली असता त्याच्या पायातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. घरात साप दिसताच आईने हंबरडा फोडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
कुटुंबीयांनी तातडीने शंभूला करमाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच शंभूने प्राण सोडले.
शंभू हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेने कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे. नातेवाईक व ग्रामस्थांनी कुटुंबीयांना धीर देत सांत्वन केले.
दरम्यान, सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या टाकीत लपलेल्या कोब्रा सापाला सुरक्षित पकडले. हा साप पुढे जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उन्हाळ्यात सापांचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर परिसर स्वच्छ ठेवणे, उंदीर-बेडूक यांचा वावर कमी करणे, तसेच साप आढळल्यास त्वरित सर्पमित्रांना संपर्क करणे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*