छत्रपती संभाजीनगर : शहरात आता खऱ्या अर्थाने उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, शहराचे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून किमान तापमान २५.८ अंश नोंदवले गेले आहे. यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले असून दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, हवेतील आर्द्रता अवघी १२ टक्के इतकी कमी असल्याने शहरात कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून रस्त्यांवर अघोषित संचारबंदी असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवड्यासाठीही उष्णतेचा इशारा दिला आहे. अंदाजानुसार, पुढील काही दिवस शहराचे कमाल तापमान ३९ ते ४० अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान २४ ते २८ अंशांदरम्यान राहील. आकाश निरभ्र राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*