छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथे गुरुवारी (ता. २३) पहाटे सहा वाजेच्या सुमारास जालना महामार्गालगत गॅस पाईपलाईन फुटून भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने तात्काळ उपाययोजना करण्यात आल्याने आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडगाव येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरून डीएमआयसी तसेच एमआयडीसी परिसरात गॅस पुरवठा केला जातो. संबंधित पाईपलाईनचे एक चेंबर काही दिवसांपूर्वी ट्रकच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त झाले होते. त्या ठिकाणी कचरा साचलेला असून तो कचरा कोणीतरी पेटवून दिल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गॅसचा प्रेशर जास्त असल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि सुमारे २० फूट उंच ज्वाळा उसळताना दिसल्या.
आगीमुळे पाईपलाईनच्या वरून गेलेल्या वीज तारा देखील तापल्या होत्या, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखत अग्निशामक दलाशी संपर्क साधला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन गॅस पुरवठा तातडीने बंद करण्यात आला. एमआयडीसी अग्निशामक दलाच्या बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
घटनेनंतर भारत पेट्रोलियमकडून गॅस पुरवठा तातडीने बंद करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, या घटनेमुळे गॅस पाईपलाईनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चेंबरची नियमित तपासणी आणि देखभाल करण्यात दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित कंपनीकडून अधिकृत अहवालानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*