छत्रपती संभाजीनगर : मतदार यादीतील सखोल पुनरिक्षण मोहिमेदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल अडीच लाखांच्या जवळपास मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील नावांचे मॅपिंग करण्यात आले असून, या प्रक्रियेत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ३२ लाख ४४ हजार २५८ मतदारांपैकी २४ लाख ७४ हजार मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांची पडताळणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सध्याच्या मतदार यादीतील नावे २००२ च्या मतदार यादीशी जुळवून तपासली जात आहेत. या प्रक्रियेत सुमारे २ लाख ४५ हजार मतदारांची नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले. यापैकी १ लाख २५ हजार मतदारांची नावे दोन वेळा नोंदविण्यात आली आहेत, तर १ लाख २० हजार मतदारांचे फोटो दोन वेगवेगळ्या मतदान ओळखपत्रांवर आढळून आले आहेत. प्रशासनाकडून अशा सर्व दुबार नोंदींची छाननी करून त्या वगळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही, त्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. संबंधित मतदारांना भारतीय नागरिकत्व, मतदार यादीत नाव समाविष्ट होण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत विचारणा केली जाईल. त्यानंतर त्यांना पुराव्यांसह आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. सुनावणीनंतर कागदपत्रांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे कायम ठेवली जातील, तर अपात्र अथवा संशयित नोंदी वगळल्या जातील.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी सांगितले की, जिल्ह्यात जवळपास २५ लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून आता मतदारांच्या घरोघरी जाऊन छापील गणना अर्ज वितरित करण्यात येणार आहेत. हे अर्ज तत्काळ भरून घेण्यात येतील. मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

561 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क