छत्रपती संभाजीनगर : शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना उस्मानपुऱ्यातील प्रतापनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. पाच सशस्त्र दरोडेखोरांनी एका व्यावसायिकाच्या बंगल्यात घुसून दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवत तब्बल ४५ मिनिटे ओलीस ठेवले. या दरम्यान सुमारे तीन लाख रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने लुटून आरोपी पसार झाले. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतापनगरातील कासलीवाल विहारसमोर राहणारे व्यावसायिक संजय लाहोटी (वय ५८) आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी रविवारी रात्री झोपेत असताना पहाटे सुमारे ३.१५ ते ४ वाजेदरम्यान पाच दरोडेखोरांनी बंगल्याच्या मागील बाजूची लोखंडी ग्रील तोडून आणि लाकडी दरवाजाची चौकट फोडून घरात प्रवेश केला. सर्व आरोपींनी चेहऱ्यावर काळे मास्क, हातात ग्लोव्हज घातले होते. त्यांच्या हातात कोयते, लोखंडी रॉड, लाठ्या आणि मोठा हातोडा अशी घातक शस्त्रे होती.

घरात शिरताच आरोपींनी दाम्पत्याच्या गळ्यावर व पोटावर कोयता ठेवून त्यांना गप्प बसण्याची धमकी दिली. कपाटाच्या चाव्या घेऊन त्यांनी घरातील तीन लाख रुपयांची रोकड, दोन तोळ्यांची सोन्याची साखळी, पाच अंगठ्या, तसेच सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के, चांदीचे ताट आणि इतर मौल्यवान दागिने लंपास केले. लूटीनंतर कोणालाही संपर्क करता येऊ नये म्हणून घरातील तीन मोबाईलमधील सिमकार्ड काढून फेकण्यात आले. तसेच पोलिसांना माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली.

दरम्यान, याच परिसरातील एका अपार्टमेंटमध्येही दरोड्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुरक्षारक्षक आणि इमारतीतील माजी सैनिक जागे झाल्याने आरोपी तेथून पसार झाले. त्या ठिकाणचे तिघे संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, त्यांनीच लाहोटी यांच्या घरावर दरोडा टाकल्याचा पोलिसांना संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला असून, रात्री झालेल्या पावसामुळे तपासात काही अडचणी आल्याची माहिती आहे. दरोडेखोरांनी घरावरील सेन्सर लाइट कपड्याने झाकून निष्क्रिय केल्याचेही तपासात समोर आले आहे. घटनेनंतर लाहोटी कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात येणार असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,372 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क