छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रक्रियेत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या मंगळवारी (दि. २५) झालेल्या सर्वसाधारण सभेत सामासिक अंतरातील बांधकामावर आकारण्यात येणारे १० टक्के शुल्क तसेच प्रशमन शुल्क आणि अॅन्सिलरी शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा गुंठेवारीतील सुमारे ४० हजार मालमत्ताधारकांना फायदा होणार आहे. मात्र, ही सवलत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंतच लागू राहणार आहे.

महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने भूमिका मांडली. प्रशासनाने शुल्कात पाच टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने नगरसेवकांनी शुल्क पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर सर्वपक्षीय सहमतीने दंडाची रक्कम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित केली जात आहेत. जुलै २०२६ मध्ये भूखंडाच्या गुंठेवारीसाठी बेटरमेंट चार्जेसमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली होती. तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंत २५ टक्के सवलत लागू आहे. बांधीव घरांच्या गुंठेवारीसाठी मात्र शुल्क मोठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक नागरिक प्रक्रिया पूर्ण करू शकत नव्हते.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ६०० चौरस फुटांच्या बांधीव घरासाठी पूर्वी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागत होते. नव्या निर्णयामुळे हे शुल्क सुमारे ५२ ते ५५ हजार रुपयांपर्यंत येणार असून नागरिकांचे ४५ ते ५० हजार रुपयांपर्यंत बचत होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी गुंठेवारीची मुदत वाढवावी आणि प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी मागणीही केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

326 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क