छत्रपती संभाजीनगर : चार्टर्ड अकाउंटंटच्या बैठकीत असताना मोबाइलवर आलेल्या दोन संदेशांना रिप्लाय देणे एका ६३ वर्षीय सीएला चांगलेच महागात पडले. कोणालाही ओटीपी न देता, बँक खात्याची माहिती शेअर न करता आणि मोबाइलमध्ये कोणतीही अनोळखी एपीके फाइल डाउनलोड केलेली नसतानाही त्यांच्या दोन बँक खात्यांतून एकूण १ लाख ७० हजार रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीए बैठकीत असताना त्यांच्या मोबाइलवर इंडसइंड बँक खात्यातून ९० हजार रुपये एका खात्यावर वळते झाल्याचा संदेश आला. त्यानंतर आयसीआयसीआय बँक खात्यातून ८० हजार रुपये वळते झाल्याचा दुसरा संदेश आला. त्याचवेळी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर ‘तुम्ही हा व्यवहार केला नसेल तर नो असा मेसेज पाठवा’ अशा आशयाचा संदेश आला. व्यवहार आपण केलेला नसल्याने त्यांनी तत्काळ ‘नो’ असा रिप्लाय केला. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच दोन्ही खात्यांतील रक्कम परस्पर वळती झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने दोन्ही बँकांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली. या घटनेमुळे कोणत्याही लिंक, संदेश किंवा संशयास्पद सूचनेला प्रतिसाद देताना नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मते, अनोळखी अॅपला एसएमएस, नोटिफिकेशन किंवा इतर संवेदनशील परवानग्या दिल्यास मोबाइलमधील माहिती धोक्यात येऊ शकते. तसेच बनावट वेबसाइट किंवा लिंकद्वारे बँकिंग क्रेडेन्शियल्स मिळवले जाऊ शकतात. काही प्रकरणांत रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाइलवर नियंत्रण मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*