अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवताना जरांगे यांनी समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “तीन वर्षांचा अखंड लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. ही शेवटची लढाई असून गाफील राहू नका,” असे आवाहन त्यांनी केले.

शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदींच्या आधारे सर्व पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही प्रमुख मागणी जरांगे यांनी पुन्हा एकदा केली आहे. तसेच वाटप केलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची वैधता तातडीने देण्यात यावी, हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र आणि वैधता कोणत्या पद्धतीने देणार, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी जरांगे यांनी जात पडताळणी समिती बरखास्त करण्याची मागणी केली. “देशातील इतर राज्यांमध्ये जात पडताळणी समिती नाही, मग महाराष्ट्रातच ती कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्रांची वैधता नाकारली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याशिवाय सातारा संस्थान आणि कोल्हापूरच्या जीआरची अंमलबजावणी करावी, मराठा समाजावरील सर्व प्रकरणे सरसकट मागे घ्यावीत आणि आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी, या मागण्याही त्यांनी मांडल्या.

“सरकारने फसवले तरी समाजासाठी प्रामाणिकपणे लढत राहणार,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी अंतरवाली सराटीत यावे आणि आंदोलनाच्या काळात काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

848 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क