छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहनांना अडवून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, या प्रकरणात पोलिसांना पहिले यश मिळाले आहे. लासूर (ता. वैजापूर) टोलनाक्याजवळ फॉर्च्युनर गाडी अडवून लूटमार करणाऱ्या टोळीतील एका दरोडेखोराला पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
२६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ४.१० ते ४.२० वाजण्याच्या सुमारास साहिल सतीश सोनवणे (२२, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) हे फॉर्च्युनरमधून प्रवास करत होते. लासूर टोलनाक्याजवळ आठ अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी साहिल यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली.
याच टोळीने समृद्धी महामार्गावर आणखी एका कुटुंबाला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. राखीपौर्णिमेनिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या ॲड. श्रीकांत मिश्रा यांच्या वाहनावर रात्री सुमारे ११.१५ वाजता दरोडेखोरांनी रॉड फेकून टायर फोडले. वाहन थांबताच तब्बल १२ जणांच्या टोळक्याने कुटुंबीयांना मारहाण करत लूटमार सुरू केली.
या घटनेदरम्यान मिश्रा यांच्या पत्नीच्या कुशीत असलेल्या १९ महिन्यांच्या अवधूत या चिमुकल्यालाही दरोडेखोरांनी हिसकावून घेतले. आईने, “सोनं, पैसे घ्या; पण लेकराला सोडून द्या,” अशी विनवणी केली. मात्र आरोपींनी बाळाला सिमेंटच्या रस्त्यावर फेकल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडण्यात आले.
सुमारे २५ मिनिटे हा थरार सुरू होता. विशेष म्हणजे, त्यावेळी महामार्गावरून हजारो वाहने जात असूनही मदतीसाठी कोणीही थांबले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून टोळीतील इतर सदस्यांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून, उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*