छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या संशयित चोरट्याला हर्सूल पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली असा एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.
हर्सूल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी मोहम्मद नबील अब्दुल सिराज, (वय २७) रा. आसेफिया कॉलनी, याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडे चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली होंडा शाईन मोटारसायकल मिळून आली. त्यानंतर आरोपीने आणखी दोन मोटारसायकली हर्सूल गावातून चोरून त्या सावंगी तलावाच्या भिंतीलगत असलेल्या एका खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तेथे कारवाई करून त्या मोटारसायकलीही जप्त केल्या.
तपासात आणखी एका मोटारसायकल चोरीचा गुन्हा क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले. अशाप्रकारे पोलिसांनी चोरीस गेलेल्या एकूण चार मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत १ लाख ६० हजार रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त मनोज पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. विशेष शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*