छत्रपती संभाजीनगर : नारळीबाग भागात घर रिकामे करण्याच्या कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाने आणि भावजयीने मिळून दोन पाळीव कुत्र्यांना शस्त्राने मारून ठार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात सख्खा भाऊ शामराव शेलार आणि भावजयी रुखमनबाई शामराव शेलार यांच्याविरुद्ध प्राणीछळ प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारळीबाग येथील आरती किराणा स्टोअरच्या मागे राहणाऱ्या ६५ वर्षीय कौशल्याबाई गंगाधर लोखंडे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. लोखंडे कुटुंबीयांनी अडीच महिन्यांचा काळ्या रंगाचा रॉकी आणि साडेतीन महिन्यांची पांढऱ्या रंगाची ब्यूटी अशी दोन पाळीव कुत्री पाळली होती. दोन्ही कुत्र्यांना त्यांच्या तीन मजली इमारतीच्या छतावर ठेवण्यात येत होते.

याच इमारतीतील चार खोल्यांमध्ये कौशल्याबाईंचा भाऊ शामराव शेलार आणि भावजयी रुखमनबाई हे गेल्या १५ वर्षांपासून विनामूल्य राहत होते. कौशल्याबाईंनी त्यांना घर रिकामे करण्यास सांगितल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान, पाळीव कुत्र्यांमुळे छतावर घाण होत असल्याचे सांगत आरोपींनी त्यांना मारून टाकण्याची धमकी इतर भाडेकरूंना दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२५ ऑगस्टच्या रात्री सुमारे ११ वाजता रॉकी आणि ब्यूटी यांना छतावर सुखरूप बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, २६ ऑगस्टच्या सकाळी सुमारे ७ वाजता दोन्ही कुत्रे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शरीरावर मारहाण तसेच शस्त्राने वार केल्याच्या खुणा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर लोखंडे कुटुंबीयांनी शामराव आणि रुखमनबाई यांच्यावर संशय व्यक्त केला.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ अंतर्गत प्राण्याला मारणे, जायबंदी करणे किंवा नुकसान करण्यासंदर्भातील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. या कलमानुसार दोष सिद्ध झाल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तसेच एकापेक्षा अधिक व्यक्तींनी समान हेतूने गुन्हा केल्यास BNS कलम ३(५) लागू होऊ शकते. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० मधील कलम ११(१) अंतर्गतही प्राण्यांवर अनावश्यक क्रूरता केल्याप्रकरणी कारवाईची तरतूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार राजेश शिंदे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

597 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क