छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन हॉटेल्सवर कठोर कारवाई केली आहे. बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्युएट हॉल आणि क्रांती चौकातील मे. गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही अन्न आस्थापनांचे FSSAI परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीत अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि साठवणुकीशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

बीड बायपास येथील छप्पन भोग थाळी रेस्टॉरंटची २० ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती के. एल. झाडे यांनी अचानक तपासणी केली. यावेळी स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या ज्वारी व बाजरीच्या पिठामध्ये प्रत्यक्ष जिवंत कीटक आढळून आले. तसेच FIFO/FEFO पद्धतीचे पालन होत नसल्याचे, अन्नपदार्थ, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि वैयक्तिक वस्तूंसाठी स्वतंत्र साठवण व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले.

रेफ्रिजरेटर व फ्रीजरमधील अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवलेले किंवा लेबल केलेले नव्हते. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक IS:10500 प्रमाणे चाचणी अहवाल तसेच RO पाण्याच्या परीक्षणाचे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. कच्च्या मालाच्या प्रयोगशाळा चाचण्या, मान्यताप्राप्त पुरवठादारांची माहिती, बिल, बॅच आणि ट्रेसिबिलिटी रेकॉर्डही अपुरे आढळले. वापरलेल्या खाद्यतेलाचे परीक्षण व विल्हेवाटीचे रेकॉर्ड, स्वच्छता कार्यक्रम, कीटक नियंत्रण, उपकरणांचे कॅलिब्रेशन आणि कर्मचाऱ्यांचे फूड सेफ्टी प्रशिक्षण याबाबतही गंभीर त्रुटी आढळल्या.

दरम्यान, क्रांती चौकातील मे. गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड येथे तपासणीदरम्यान कापून ठेवलेले दुर्गंधीयुक्त पनीर आढळले. तयार ग्रेव्ही व इतर खाद्यपदार्थांवर तयार करण्याची वेळ किंवा वापरण्याची अंतिम वेळ नमूद नव्हती. तापमान नियंत्रित साठवणूक आणि FIFO/FEFO पद्धतीचेही पालन होत नव्हते.

विशेष म्हणजे, स्वच्छतागृहाच्या प्रवेशाजवळच भाज्या कापण्याचे काम सुरू होते. परिसरात कोळीष्टके व मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली. खरकटी भांडी व सांडपाण्याच्या संपर्कात येणाऱ्या वॉशिंग एरियामध्ये उकडलेले नूडल्स उघडे ठेवण्यात आले होते. कढईतील खाद्यतेल काळेकुट्ट झालेले आढळले. कांदे व इतर कच्चा माल थेट जमिनीवर साठवण्यात आला होता, तर कीटक नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था अपुरी होती.

या आस्थापनेवर यापूर्वीही १८ डिसेंबर २०२५ रोजी तपासणी करून सुधारणा नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही सुधारणा न झाल्याने न्यायालयीन प्रकरणात १० एप्रिल २०२६ रोजी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

सार्वजनिक आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी श्री. द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) अंतर्गत दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबन काळात संबंधित हॉटेल्सना अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Joint Commissioner श्री. श्रीकांत करकळे यांनी शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपेय विक्रेत्यांना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,199 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क