छत्रपती संभाजीनगर : कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने घाला घातला. मोठ्या भावाला कामावरून घरी घेऊन येताना त्यांच्या दुचाकीला सुसाट कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्री सुमारे २ वाजता चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर घडली.

निखिल अंकुश आरके (२३) आणि कपिल अंकुश आरके (१९), अशी मृत भावांची नावे आहेत. दोघेही मूळचे सिल्लोड येथील असून सध्या आंबेडकरनगर, गल्ली क्रमांक १२ येथे मामाकडे राहत होते. दोघेही सिडको परिसरातील एका मॉलमध्ये नोकरी करत होते.

बुधवारी रात्री कपिलची ड्युटी रात्री नऊ वाजता संपली. त्यानंतर तो घरी आला. मोठा भाऊ निखिलची ड्युटी संपण्याची वेळ झाल्याने कपिल त्याला घेण्यासाठी दुचाकीवरून पुन्हा मॉलकडे गेला. निखिलला सोबत घेऊन दोघे घरी परतत असताना एमएच-२८-बीएस-०९९० क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणपत राहिरे, सहायक निरीक्षक भरत पाचोळे आणि उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सहायक निरीक्षक कैलास लहाणे करत आहेत.

दरम्यान, निखिल आणि कपिल यांचे वडील अंकुश आरके हे सिल्लोडमध्ये मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दोन मुलांनी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावावा, या आशेने त्यांनी दोघांना शहरात पाठवले होते. दोघांना नोकरी मिळाल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. मात्र, एकाच रात्रीत दोन्ही तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने आरके कुटुंबाचा आधारच हिरावला गेला. दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,024 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क