छत्रपती संभाजीनगर : गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने राबवलेल्या शिक्षण हक्क कायद्यालाच (आरटीई) हरताळ फासल्याचा प्रकार करमाड येथे समोर आला आहे. आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीच्या पालकाकडे शाळेची फी म्हणून ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.

शिवाजी बाबासाहेब घुले (४४, संस्थाचालक) आणि रेणुका रामनाथ कुबेर (३८, मुख्याध्यापिका) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराच्या मुलीचा फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश झाला आहे. नियमानुसार अशा विद्यार्थ्यांकडून शाळेची फी आकारता येत नाही. मात्र, मुख्याध्यापिका रेणुका कुबेर यांनी चार हजार रुपये फी भरण्यासाठी पालकाकडे तगादा लावल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रारदाराने १३ ऑगस्ट रोजी एसीबीकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर पथकाने शाळेत जाऊन लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी संस्थाचालक आणि मुख्याध्यापिकेने संगनमत करून २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांची प्रत्येकी चार हजार रुपये, अशी एकूण आठ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर सोमवारी (१७ ऑगस्ट) एसीबीने शाळेत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे चार हजार रुपये स्वीकारताना संस्थाचालक शिवाजी घुले याला रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराने खांद्यावर रुमाल टाकून नियोजित इशारा करताच पथकाने कारवाई केली. याचवेळी मुख्याध्यापिका रेणुका कुबेर यांनाही ताब्यात घेण्यात आले. पथकाने शाळेतील रजिस्टरसह विविध कागदपत्रे ताब्यात घेतली असून, करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

136 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क