छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात सराईत गुन्हेगारांकडून एका युवकाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेऊन कपडे काढून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी यापूर्वीच दुसऱ्या गुन्ह्यात अटकेत आहे.
रिजवान शेख, आमेर पठाण आणि मेराज शेख (सर्व रा. गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जाहेद गौस बागवान हा युवक १० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दहा वाजता पुंजाबाई चौक परिसरात एका बंद कारमध्ये झोपला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी जाहेदला जाब विचारत मारहाण केली आणि जबरदस्तीने रिक्षात बसवून एसआरपीएफ कॅम्प परिसरातील एका निर्जन विहिरीजवळ नेले.
तेथे आरोपींनी जाहेदचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओही त्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. या घटनेत जाहेद गंभीर जखमी झाला. दुसऱ्या दिवशी आरोपींनीच त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले.
उपचारानंतर परतत असताना त्रिशरण चौक परिसरात जाहेदला त्याचे वडील रस्त्यावर दिसले. त्याच क्षणी त्याने धाडस करून चालत्या रिक्षातून उडी मारली आणि आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर आरोपी रिक्षासह पसार झाले.
जाहेदच्या तक्रारीवरून १५ ऑगस्ट रोजी जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी रिजवान शेख हा लुटमारीच्या गुन्ह्यात आधीच अटकेत असून, तो सध्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणातही त्याला रीतसर अटक करण्यात येणार असून, आमेर पठाण व मेराज शेख यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*