छत्रपती संभाजीनगर : समाजाला नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि संस्कारांचे धडे देणाऱ्या शिक्षकानेच जन्मदात्या आईची २० गुंठे जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या जागी दुसरी महिला उभी करून बनावट मुख्त्यारपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर याच मुख्त्यारपत्राच्या आधारे बक्षिसपत्र करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात १२ ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत कडुबा सपकाळ असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याची पत्नी सुनीता भागवत सपकाळ, घनश्याम गंगावे, सुशील बोराडे आणि एका अनोळखी महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. लक्ष्मीबाई कडुबा सपकाळ (६५, रा. चिंचोली लिंबाजी, ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली आहे.

पतीच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून सपकाळ दाम्पत्याने शरणापूर येथे ४० गुंठे जमीन घेतली होती. सुरुवातीला भागवतच्या नावावर असलेली जमीन नंतर आई लक्ष्मीबाई यांच्या नावावर करण्यात आली. २०२५ मध्ये आर्थिक गरज असल्याने त्यांनी त्यातील २० गुंठे जमीन मुलीला १७ लाख २५ हजार रुपयांना विकली. उर्वरित २० गुंठे जमीन विकण्यासाठी सातबारा काढल्यानंतर ती भागवतने परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे लक्षात आले.

फिर्यादीनुसार, भागवतने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी आईच्या जागी दुसरी महिला उभी करून बनावट मुख्त्यारपत्र तयार केले. त्यानंतर ४ एप्रिल २०२५ रोजी याच मुख्त्यारपत्राच्या आधारे स्वतःच्या नावावर बक्षिसपत्र करून जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

प्रकार समोर आल्यानंतर जाब विचारला असता सुनेने खोटी पोलिस तक्रार करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

820 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क