छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून व्यवसायासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १५ दिवसांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजार १०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. लॉगिन फी, इन्शुरन्स, जीएसटी आणि कमिशनच्या नावाखाली पैसे उकळल्यानंतर आरोपींनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून व्यावसायिकाला ब्लॅकमेल केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, धर्मेंद्र विनोदानंद झा याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश नारायणराव रोहिणीकर यांचा टीव्ही सेंटर परिसरात डिझाईन व प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. जुलै २०२५ मध्ये गणेश देशमुख याने फायनान्स कंपनीचा मध्यस्थ धर्मेंद्र झा याला त्यांच्या कार्यालयात आणले. दिल्लीतील कंपनीकडून १५ दिवसांत ७ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
यानंतर रोहिणीकर यांना दिल्लीला नेऊन आरोपींनी विविध शुल्कांच्या नावाखाली रक्कम मागितली. १४ ऑगस्ट २०२५ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांनी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजार १०० रुपये दिले. यामध्ये अशोक सिंघलच्या खात्यावर ६७ लाख ८० हजार, हरजितसिंग रुपराहच्या खात्यावर ३ लाख आणि धर्मेंद्र झाला ३८ लाख रुपये रोख दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच इतर आरोपींच्या खात्यांवरही रक्कम वळविण्यात आली.
पैसे घेतल्यानंतर कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर बनावट फिटनेस सर्टिफिकेट तयार करून त्यावर रोहिणीकर यांची सही व अंगठा घेण्यात आला. प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगून प्रकरण मिटविण्यासाठी आणखी १० लाख रुपये उकळण्यात आले. तसेच कर्जाच्या परतफेडीसाठी ८४ धनादेश आणि कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या.
धर्मेंद्र झाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. दरम्यान, शहरात कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याने नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शुल्क किंवा वैयक्तिक कागदपत्रे देण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*