छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना थायलंड आणि श्रीलंका येथे मोफत सहलीला नेण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघे ५०० रुपये भरल्यानंतर आठ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर नेण्याचे सांगून अनेक नागरिकांकडून पैसे, आधारकार्डच्या छायांकित प्रती आणि फोटो घेण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समतानगर येथील शोभा उत्तम देवकर (७०) हिने जुलै महिन्यात जवाहर कॉलनी परिसरातील महिलांना एकत्र केले होते. पालकमंत्री संजय शिरसाट हे नागरिकांसाठी थायलंड व श्रीलंकेची आठ दिवसांची सहल आयोजित करणार असून, त्यासाठी प्रत्येकाने केवळ ५०० रुपये भरायचे आहेत. उर्वरित खर्च मंत्री शिरसाट करणार असल्याचे तिने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या आमिषाला बळी पडून जवाहर कॉलनीतील आम्रपाली घुंगरराव (३५) यांच्यासह अनेकांनी प्रत्येकी ५०० रुपये दिले. त्यासोबत आधारकार्डची झेरॉक्स प्रत आणि फोटोही देण्यात आले. मात्र, सहलीच्या तारखा वारंवार बदलू लागल्याने नागरिकांना संशय आला.
त्यानंतर नागरिकांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून सहलीबाबत माहिती घेतली. त्यावेळी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून अशी कोणतीही सहल आयोजित करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आम्रपाली घुंगरराव यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शोभा देवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*