छत्रपती संभाजीनगर : शहरात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यापूर्वी पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक शाखेने पोलीस विभागातच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी (दि. १०) शहरातील विविध पोलीस ठाणे आणि कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर करण्यात आलेल्या तपासणीत २६ पोलीस अधिकारी-अंमलदार विनाहेल्मेट दुचाकीवरून आल्याचे आढळून आले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना एकूण २६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलीस विभागातील अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी चालविताना हेल्मेट वापरण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

विनाहेल्मेट येणाऱ्या पोलिसांना प्रवेश न देण्यासोबतच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोमवारी या मोहिमेचा विस्तार शहरातील विविध पोलीस ठाणे आणि इतर पोलीस कार्यालयांपर्यंत करण्यात आला. संबंधित कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर वाहतूक शाखेची पथके तैनात करण्यात आली होती. तपासणीदरम्यान विनाहेल्मेट आढळलेल्या २६ अधिकारी-अंमलदारांवर कारवाई करण्यात आली.

सामान्य वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही हेल्मेटच्या नियमातून कोणतीही सूट नसल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. ‘कायदा सर्वांसाठी समान’ या भूमिकेतून ही कारवाई करण्यात येत आहे.

आता शासकीय कार्यालयांकडे मोर्चा

पोलीस विभागात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केल्यानंतर वाहतूक शाखेचा मोर्चा आता शहरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांकडे वळणार आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून कार्यालयात येताना हेल्मेट वापरावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच कार्यालयप्रमुखांना पत्र पाठवून आवाहन केले आहे. आगामी काळात कार्यालयांच्या परिसरातही वाहतूक शाखेची पथके तैनात करून विनाहेल्मेट येणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

710 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क