छत्रपती संभाजीनगर : नोकरीसाठी अर्ज देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ४२ वर्षीय महिलेला शेअरिंग रिक्षातील महिला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून महिला चोरट्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमाननगर, गल्ली क्रमांक ३ येथे भाड्याने राहणाऱ्या ४२ वर्षीय आशा (नाव बदललेले) या २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ४ वाजता नोकरीसाठी अर्ज देण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडल्या होत्या. शाहनूरमियाँ दर्ग्याजवळील बस स्टँडवरून त्यांनी शेअरिंग रिक्षा पकडली. त्यांच्या पर्समध्ये आवश्यक कागदपत्रांसह सोन्याचे दागिने होते. रिक्षात त्यावेळी एक अनोळखी महिला आधीच बसलेली होती.

रिक्षा काही अंतर पुढे गेल्यानंतर आणखी तीन महिला प्रवासी रिक्षात बसल्या. त्यामुळे रिक्षात मोठी गर्दी झाली. पाच प्रवासी झाल्याने बसण्यास अडचण निर्माण झाल्याने फिर्यादी महिला पुढे जाऊन चालकाच्या बाजूला बसल्या. काही अंतरावर आधीपासून बसलेली एक महिला रिक्षातून उतरली. जागा मोकळी झाल्यानंतर फिर्यादी पुन्हा मागील बाजूस जाऊन बसल्या. याच गर्दीचा फायदा घेत महिला चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चोरी केल्याचा संशय आहे.

हनुमाननगर चौकात रिक्षातून उतरल्यानंतर महिलेच्या लक्षात पर्सच्या दोन्ही चेन उघड्या असल्याचे आले. त्यांनी तातडीने पर्स तपासली असता, त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ३ ग्रॅमचे शॉर्ट मंगळसूत्र, १३ ग्रॅमचे लांब मंगळसूत्र, १० ग्रॅमचे कानातले आणि ९.५ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय ३ ग्रॅम वजनाची चांदीची चेनही चोरीला गेली आहे.

या घटनेनंतर महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, रिक्षातील संशयित महिलांची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुरेश तारव करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

284 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क