छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला असून, ट्रॅव्हल्समधील १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात अन्य प्रवाशांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे.
हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक ४७३.६ येथे, हडस पिंपळगाव शिवारात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून एकूण ३० प्रवासी प्रवास करत होते. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात असताना समोरून जाणाऱ्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलिस, महामार्ग पोलिस आणि रस्ता सुरक्षा दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना बाहेर काढून जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिस आणि संबंधित पथकांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ट्रॅव्हल्सचा भरधाव वेग, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू असून, तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*