छत्रपती संभाजीनगर : वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आता दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण-दुशिंगपूर शिवारात चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान गुरुवारी मध्यरात्री धावत्या वाहनांचे टायर फोडून लूटमार करण्यात आली. या घटनेत छत्रपती संभाजीनगरमधील वकील श्रीकांत मिश्रा यांच्या कुटुंबाला दरोडेखोरांनी लक्ष्य केले.

मिश्रा कुटुंबीय २७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जात होते. सिन्नरजवळ त्यांची कार सुमारे १०० किमी प्रतितास वेगाने असताना अचानक जोरदार धक्का बसला. कार थांबवून पाहिले असता टायर आणि रिम फुटल्याचे दिसले. स्टेपनी काढण्यासाठी मिश्रा खाली उतरले असता मास्क घातलेल्या ४ ते ५ जणांनी त्यांच्या पाठीवर वार करून मारहाण केली.

मिश्रा यांनी कारमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोरांनी दरवाजा धरून त्यांना अडवले. त्यानंतर आणखी काही जण घटनास्थळी आले. त्यांनी मिश्रा यांच्या पत्नीच्या मांडीवर असलेल्या मुलाला हिसकावून घेतले. मुलाला काही करू नका, तुम्हाला हवे ते घेऊन जा, अशी विनवणी कुटुंबीयांनी केली. त्यानंतर दरोडेखोरांनी मुलाला खाली फेकून दिले.

दरोडेखोरांनी कुटुंबाकडील सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, चैन, मंगळसूत्र, बांगड्या, पाटल्या, घड्याळे आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लुटला. तसेच कारमधील बॅगा तपासून आवडलेले कपडे, चार्जर आणि खाण्यापिण्याचे साहित्यही घेऊन गेले.

तब्बल अर्धा तास हा थरार सुरू होता. प्राथमिक माहितीनुसार, या टोळीने तीन वाहनांना लक्ष्य केले असून महामार्गावर लोखंडी धारदार वस्तू टाकून वाहनांचे टायर फोडण्यात आले. मिश्रा कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,996 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क