छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्त्यांवर आता हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे चांगलेच महागात पडत आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू रोखण्यासाठी शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘हेल्मेट स्वीकृती’ मोहिमेअंतर्गत सलग तिसऱ्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. बुधवारी दिवसभरात तब्बल ५ हजार १७५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५८ लाख ८९ हजार १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४७ हजार ५०० रुपयांचा दंड घटनास्थळीच वसूल करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून सातत्याने हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक दुचाकीस्वारांनी आता हेल्मेट वापरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर वाहतूक शाखेसह शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ या गर्दीच्या वेळेत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन चौधरी, रेखा लोंढे, नितू तायडे, सहायक पोलीस निरीक्षक रवी गच्चे, सचिन मिरधे यांच्यासह वाहतूक शाखा आणि पोलीस ठाण्यांतील कर्मचारी कारवाईसाठी तैनात होते.
हर्सल टी, मुकुंदवाडी, जळगाव टी, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल, दर्गा चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक, क्रांती चौक, सेशन कोर्ट, महावीर चौक, रेल्वे स्टेशन चौक, मिल कॉर्नर, नगरनाका यासह अनेक प्रमुख ठिकाणी तपासणी करण्यात आली.
दरम्यान, व्यापारी महासंघाने मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणी महासंघाने निवेदनाद्वारे केली. मात्र, शहराबाहेरील महामार्गांवर हेल्मेट नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास आपला विरोध नसल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*