अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले आहे. अंतरवाली सराटी येथे आज शनिवारी उपोषणाच्या १५व्या दिवशी झालेल्या महाबैठकीत मुंबईकडे कूच करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि आंदोलनाचे नियोजन जाहीर केले.
गणेश चतुर्थीनंतर १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी शहागड, गेवराई, बीड आणि मांजरसुबा-लिंबागणेश मार्गे पदयात्रा पुढे सरकणार असून पाटोदा येथे पहिला मुक्काम केला जाणार आहे. त्यानंतर १६ सप्टेंबरला श्रीगोंदा, १७ सप्टेंबरला पुण्यातील हडपसर आणि १८ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुक्काम करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवेश करून सकाळी १० वाजता आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याचे नियोजन आहे.
बैठकीत बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शिस्त आणि संयम राखण्याचे आवाहन केले. मुंबईचा प्रवास मोठा असल्याने सर्वांनी एकाच मार्गाने आणि शिस्तीत पुढे जावे. वाहनांची ओव्हरटेकिंग करू नये, कोणालाही त्रास देऊ नये आणि रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलनाच्या मार्गावर पोलिसांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत जरांगे यांनी प्रशासनाला बॅरिकेड्स न लावण्याचा इशारा दिला. पोलिसांनी आंदोलकांना अडवले, तर गोंधळ न घालता वाहने थांबवून शांततेने रस्त्यावरच ठिय्या देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मार्गातील गावांमधील नागरिकांनी कुटुंबासह आंदोलकांचे स्वागत करून पाठबळ द्यावे, तसेच वाहनधारकांनी मुंबईच्या वेशीपर्यंत सोबत यावे, असेही जरांगे यांनी सांगितले.
हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी काही दिवसांत मराठा आंदोलनाची दिशा आणि प्रशासनाची भूमिका याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*