हिंगोली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिजित दिपके हे दिल्लीत आंदोलनासाठी गेले असताना त्यांच्या आजीच्या निधनाची बातमी समोर आल्याने दिपके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सावित्रीबाई दिपके या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, दीर्घ आजाराशी झुंज देताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संतुक पिंपरी परिसरात शोककळा पसरली असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही दुःख व्यक्त केले जात आहे.
दिल्ली विमानतळावर अभिजित दिपके यांना ताब्यात घेतले
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी अभिजित दिपके मुंबईहून विमानाने दिल्लीला रवाना झाले होते. मात्र, दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यांचे सहकारी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावरील पुढील कारवाईबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला त्यांच्या आजीनेही पाठिंबा दिला होता. अशा परिस्थितीत नातू दिल्लीत आंदोलनात व्यस्त असतानाच आजीचे निधन झाल्याने या घटनेला भावनिक किनार लाभली आहे.
अंत्यदर्शनासाठी गावी पोहोचणार का?
आजीच्या निधनाची बातमी समजताच अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके आणि आई अनिता दिपके हे संतुक पिंपरी या मूळ गावी रवाना झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अभिजित दिपके हे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना आजीच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी गावी जाता येणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या दुःखद प्रसंगी ते गावी कधी पोहोचणार, याकडे त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*