छत्रपती संभाजीनगर : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. भगवान ईश्वर भोसले (वय २४) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने आणि ह्युंदाई कंपनीची कार असा एकूण २ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी कोलते टाकळी येथील दीपक रावसाहेब कोलते यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास हाती घेतला.
पोलीस निरीक्षक विजयंसिंग राजपूत यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील हॉटेल्स, पेट्रोल पंप आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे भगवान ईश्वर भोसले हा संशयित असल्याचे निष्पन्न झाले.
सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात
आरोपी सोलापूर-धुळे महामार्गावरून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाचोड हद्दीतील मुरमा फाटा येथे सापळा रचला. तेथे आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीच्या चौकशीत कोळते टाकळी, पाथ्री, उंडणगाव आणि शिवनावाडी परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला. या प्रकरणांत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.
दोन पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड
या कारवाईमुळे वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात सोन्या-चांदीचे दागिने आणि ह्युंदाई कंपनीच्या कारचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४०० रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास वडोदबाजार पोलीस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*