जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाची पाणीपातळी मागील महिन्यात १३ टक्के होती, जी आता ९० टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात १६ हजार १८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणीपातळी ९५ टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी धरणास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संपर्कात राहून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि.प. सीईओ विकास मीना, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*