दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात पार पडला, मात्र सिल्लोड तालुक्यातील वांजोळा येथे देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना काल घडलेल्या दुर्दैवी घटनेने सगळ्यांनाच हादरवून टाकले. पूर्णा नदीत मूर्ती विसर्जन करताना बाप-लेक बुडाल्याची घटना घडली असून, सध्या दोघांचाही शोध घेण्यासाठी रेस्क्यू पथकाची मोहीम सुरू आहे.
सांडू नामदेव सागरे आणि निवृत्ती सांडू सागरे असे बुडालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दसऱ्यानिमित्त देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ते पूर्णा नदीच्या पात्रात उतरले होते. याच वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दुर्दैवी अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांसह अग्निशामक दल आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. काल सायंकाळपर्यंत पथकांनी शोधमोहीम राबवली, मात्र अंधार झाल्याने शोध थांबवावा लागला. आज रविवारी पहाटेपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
या घटनेत १४ वर्षाचा मुलगा नदीकाठी उभा राहिल्याने तो सुदैवाने बचावला. त्यानेच गावकऱ्यांना ही दुर्दैवी घटना कळवली. बाप-लेक नदीत बुडाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या संपूर्ण गाव पूर्णा नदीच्या किनारी गोळा झाले असून, बुडालेल्या दोघांचा शोध लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*