विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, तत्काळ निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेनुसार जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालय परिसरात कोणत्याही प्रकारचे उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव इत्यादी आंदोलने करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश जारी करत, निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही इमारती, आवार, भिंती किंवा व्यक्तिगत जागांचा वापर संबंधित मालकाच्या परवानगीशिवाय करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच यासाठी संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
निवडणूक प्रचारादरम्यान, राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींनी नमुना मतपत्रिकेची छपाई करताना, निवडणूक आयोगाने ठरविलेल्या आकार, कागदाचा वापर करणे अनिवार्य असून, उमेदवाराचे नाव आणि चिन्हे यावर आयोगाने निर्बंध लादले आहेत.
ध्वनिक्षेपक वापरावर मर्यादा
निवडणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकाचा वापर सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही वाहनावर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
प्रचार साधनांवर निर्बंध
पोस्टर्स, बॅनर्स, कटआउट्स, होर्डिंग्ज यामुळे रहदारीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शासकीय इमारती, परिसरांचा प्रचारासाठी वापर करण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. तसेच परवानगीशिवाय कोणत्याही वाहनांवर झेंडे, बॅनर किंवा घोषवाक्ये लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.
आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*