छत्रपती संभाजीनगर: शहराची तहान भागवणाऱ्या जलवाहिन्या सतत फुटत असल्याने पाणीपुरवठा कोलमडला आहे. मंगळवारी दुरुस्त केलेली १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी अवघ्या २४ तासांत पुन्हा फुटली, तर बुधवारी दुपारी ७०० मिमी व्यासाची ५० वर्षे जुनी जलवाहिनी फारोळा येथे फुटली. यामुळे आधीच विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आणखीनच बिघडला आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांपासून पाणी आलेले नाही, त्यामुळे नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.
वारंवार जलवाहिन्या फुटून शहर तहानले!
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीपुरवठ्यात सातत्याने अडथळे येत आहेत. शहरातील ७००, ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने मनपाला वारंवार दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागत आहे. २० मार्च रोजी रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली १२०० मिमी जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी तब्बल ३६ तासांचा शटडाऊन घेण्यात आला. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण सोमवारी रात्री फारोळा फाटा येथे याच जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह उखडल्याने पुन्हा दुरुस्तीचे काम करावे लागले. मंगळवारी दुपारी दुरुस्ती पूर्ण होताच बुधवारी दुपारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली, त्यामुळे फारोळा पंप हाऊसमधील मॅनीफोल्ड पाइपला गळती सुरू झाली आणि पंपिंग बंद करावे लागले.
२० एमएलडी पाणीपुरवठा ठप्प!
शहरात सध्या फक्त १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू आहे, परंतु ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद पडल्याने २० एमएलडी पाणी कमी मिळत आहे. याशिवाय मागील पाच दिवसांपासून २०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद आहे, मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी शहराला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
टँकर आणि जारवर अवलंबून नागरिक!
▪️ शहरातील २०% वसाहतींना मागील चार दिवसांपासून पाणी मिळालेले नाही.
▪️ २२ मार्चपासून पाणीपुरवठ्याचे टप्पे पुढे ढकलले जात आहेत.
▪️ पाण्यासाठी नागरिकांना खाजगी टँकर आणि जारवर अवलंबून राहावे लागत आहे.
▪️ विविध भागांतील जार विक्री केंद्रांवर पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जुने शहर, नवीन शहर आणि सिडको-हडको भाग पाण्याविना!
शहराच्या जुन्या वसाहतींसह नवीन शहर, सिडको-हडको भागातील नागरिक गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाण्याविना तडफडत आहेत. अनेक ठिकाणी पाणीटंचाईमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*