छत्रपती संभाजीनगर: अजिंठा लेणीत मंगळवारी (ता. २६) पुन्हा एकदा मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात १० ते १२ पर्यटक जखमी झाले असून, काहींना किरकोळ दुखापत झाली. गेल्या १५ दिवसांपासून अजिंठा आणि वेरुळ लेणी परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत.
अजिंठा आणि वेरुळ या जागतिक वारसा स्थळांच्या परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मधमाश्यांची पोळे आहेत. मात्र, ही पोळे हटविण्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, मधमाश्यांकडून वारंवार हल्ले होत असून पर्यटक त्रस्त झाले आहेत. मंगळवारीच्या घटनेत पर्यटकांनी स्वतःला वाचवण्यासाठी रुमाल, स्कार्फ आणि हाताने चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. तरीही मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला करून डंख मारले. काहींनी लेण्यांमध्येच थांबून स्वतःच्या शरीरावरील मधमाश्यांचे काटे काढले.
या प्रकारानंतर अनेक पर्यटक नाराज झाले असून काहींनी पुढील काळात अजिंठा लेणीला भेट न देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज
वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून मधमाश्यांची पोळे सुरक्षितरित्या हटवावीत, अन्यथा या घटनांमुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*