छत्रपती संभाजीनगर: शहरात वर्षभरासाठी लागणाऱ्या धान्य खरेदीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. यंदा काही धान्यांच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत असले तरी, सध्या गहू, ज्वारी, बाजरी यांचे दर स्थिर असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.
शहरातील ग्राहक वर्षभरासाठी गहू, ज्वारी, बाजरी यासारख्या धान्यांची साठवणूक करण्यावर भर देत आहेत. यंदा जाधववाडीतील बाजार समिती हे धान्य खरेदीसाठी मुख्य केंद्र ठरले आहे. बाजार समितीत गव्हाचे दर सरासरी २७०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल असून, बिना फिल्टर गहू २६०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. बाजरी ३३०० ते ३६०० रुपये प्रति क्विंटल तर ज्वारी २२०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल दराने उपलब्ध आहे.
बाहेरील राज्यांतील धान्यास जास्त मागणी
शहरातील ग्राहक स्थानिक धान्यांपेक्षा इतर राज्यांतील उच्च प्रतीच्या धान्यास प्राधान्य देत आहेत. स्थानिक ४९६ आणि १०२ वाणाच्या गव्हाऐवजी मध्यप्रदेशातील ‘शरबती’ (लड्डू भोग) वाणाची जास्त मागणी आहे. तसेच ज्वारीच्या बाबतीत सोलापूरच्या ‘माळ दांडी’ प्रकाराला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे. मात्र, बाजरी खरेदीसाठी स्थानिक उत्पादकांनाच ग्राहक प्राधान्य देत आहेत.
किफायतशीर दर आणि आर्थिक नियोजन
रब्बी हंगाम संपल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक निकड व साठवणुकीच्या समस्येमुळे धान्य मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. परिणामी, मागणी आणि पुरवठा यांचा समतोल राखला जात असल्याने शहरातील कामगार, कष्टकरी आणि नोकरदार वर्ग किफायतशीर दरात वर्षभरासाठी धान्य खरेदी करण्यास सक्षम झाला आहे.
पावसाळ्यापूर्वी खरेदीला वेग
“सध्या धान्याचे दर स्थिर असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. विशेषतः गव्हाची सर्वाधिक मागणी आहे.पावसाळ्यापूर्वी धान्य खरेदीची लगबग सुरू झाली असून, ग्राहक मोठ्या प्रमाणावर गहू, ज्वारी, बाजरी खरेदी करत आहेत.”
गणेश भरकर, धान्य विक्रेते, जाधववाडी
शहरातील धान्य खरेदीने वेग घेतला असून, भाववाढीपूर्वी वर्षभरासाठी धान्य साठविण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*