छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाने (सीएसएमआरडीए) आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत मालमत्ता आणि गुंठेवारी नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना जाहीर केली आहे. यापूर्वी गुंठेवारी नियमित करताना आकारण्यात येणारे बेटरमेंट चार्जेस अत्यंत जास्त असल्याने नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अनेक अनधिकृत बांधकामे आणि मालमत्ता अद्यापही नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता नव्या अभय योजनेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून कमी शुल्कात मालमत्ता नियमित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सीएसएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री आणि पैठण या पाच तालुक्यांतील तब्बल ३१३ गावांचा समावेश आहे. तसेच शासनाने सिडकोचे झालर क्षेत्र वगळून त्या भागाची जबाबदारीही सीएसएमआरडीएकडे सोपविली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि गुंठेवारीच्या प्रकरणांवर निर्णय घेण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

महानगरपालिकेच्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सीएसएमआरडीएनेही त्याच धर्तीवर ही योजना लागू केली आहे. या माध्यमातून नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळण्यासोबतच प्राधिकरणालाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

योजनेनुसार १ मे ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत प्रस्ताव सादर करणाऱ्या नागरिकांना बेटरमेंट चार्जेसवर केवळ १० टक्के शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान प्रस्ताव दाखल केल्यास ५० टक्के शुल्क आकारले जाईल. तर १ नोव्हेंबर २०२६ पासून पूर्ण १०० टक्के शुल्क भरावे लागणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

243 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क