छत्रपती संभाजीनगर : येवला येथील एका शिक्षकाने सात लाख रुपयांच्या वादातून शहरातील एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला तब्बल २४ तास बंदिस्त ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपहरणानंतर आरोपींनी अपहृताच्या पत्नीला फोन करून सात लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या महिलेने तत्काळ शहर पोलिसांत धाव घेतली. गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू करून अवघ्या २४ तासांत अपहृताची येवला येथून सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी शिक्षक जनार्दन साहेबराव उगले (वय ३८) आणि विलास दादा आव्हाड (वय ५५, दोघे रा. येवला, जि. नाशिक) यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेगाव कासंबरी दर्गा परिसरातील अजीज कासकर यांचे आरोपींनी चारचाकीतून अपहरण केले. त्यानंतर त्यांना येवला येथील एका मंदिराजवळील भक्त निवासात डांबून बेदम मारहाण करण्यात आली.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, दिलीप मोदी, प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, संतोष चौरे आणि रोहित जाधव यांच्या पथकाला येवला येथे पाठविण्यात आले. अपहृताच्या नातेवाइकांच्या मदतीने आरोपींशी संपर्क साधण्यात आला. आरोपींनी बसस्थानक परिसरात बोलावल्याने पोलिसांनी सापळा रचून प्रथम आव्हाड आणि नंतर मुख्य आरोपी उगले याला ताब्यात घेत कासकर यांची सुटका केली.
चौकशीत आरोपी उगले याने बनावट नोटांच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची कबुली दिली. कासकर याला १५ लाख रुपये दिल्यानंतर ३० लाखांच्या बनावट नोटा मिळणार होत्या, असा दावा त्याने केला. मात्र पैसे देऊनही नोटा न मिळाल्याने अपहरण केल्याचे समोर आले. या प्रकरणातील ‘राजू’ नावाच्या मध्यस्थाचा शोध पोलिस घेत असून बनावट नोटांच्या रॅकेटचा मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*