छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या गेटला गळती लागल्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी प्रतीक्षाच वाढणार आहे.
माहितीनुसार, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी धरणात उभारण्यात आलेल्या जॅकवेलच्या गेटमध्ये गंभीर गळती आढळून आली आहे. याशिवाय, अँप्रोच ब्रिजवरील चेअरबेड्सनाही तडे गेल्याचे समोर आले आहे, जे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. या त्रुटींबाबत न्यायालयीन समितीने अडीच महिन्यांपूर्वीच तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून अद्याप अपेक्षित गतीने काम पूर्ण करण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ५० टक्के त्रुटी अद्यापही प्रलंबित आहेत. दरम्यान, जॅकवेल गेटची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व घडामोडींमुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता ही योजना जूनपर्यंत पूर्ण होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*