महाराष्ट्र सरकारने 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024’ जाहीर केली होती. या योजनेतून 18 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पूर्वी अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत होती, मात्र आता अर्जदारांची वाढती संख्या पाहता ही मुदतवाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी महिलांना उद्देशून सांगितले की, “माझ्या सर्व बहिणींना नमस्कार… आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. ताई, तू काळजी करू नकोस, महायुती सरकार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, आणि पोषणासाठी दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.”
मुख्यमंत्र्यांनी योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी लक्षात घेता अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. अंतिम मुदतीत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अंतिम मुदतीत अर्ज करणाऱ्यांना देखील जुलैपासून लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.