मुंबई : राज्य सरकारने उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या तिजोरीवर आधीच ९ लाख कोटी रुपयांचे कर्जाचे ओझे असून ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे ४० हजार कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी दारूवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी व विदेशी दारूच्या दरांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे सरकारला दरवर्षी सुमारे १४ हजार कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या दारूविक्रीतून राज्याला दरवर्षी २५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो, जो आता ४० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क हे उत्पादन खर्चाच्या ३ पटीतून ४.५ पट करण्यात आले आहे. देशी दारूवर प्रति प्रुफ लिटर १८० रुपयांवरून २०५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र बिअरला या दरवाढीतून वगळण्यात आले आहे, कारण सध्या देशात महाराष्ट्रात बिअरचे दर सर्वाधिक आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी १,२२३ नवीन पदांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये निरीक्षक व अधीक्षक पदांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर येथे नव्या कार्यालयांची स्थापना केली जाणार आहे.
तसेच ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (एमएमएल) या नवीन विदेशी मद्यप्रकारास मान्यता देण्यात आली असून याचा फायदा केवळ राज्यातील उत्पादकांनाच मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*