छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील पाटोदा हे गाव देशाच्या नकाशावर आपल्या कार्यक्षमतेमुळे झळकले आहे. रविवारी प्रसारित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमातून त्यांनी या गावाचे विशेष कौतुक करत ‘ग्रामीण भारतासाठी प्रेरणास्थान’ असे संबोधले.

पाटोदा ग्रामपंचायतीने जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, सौर ऊर्जा, डिजिटल ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. 2006 साली राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या ग्रामपंचायतीने ‘कार्बन न्यूट्रल’ गाव म्हणूनही मानांकन मिळवले आहे. 2023 मध्ये पाटोदाने राष्ट्रीय पंचायत पुरस्काराच्या ‘कार्बन न्यूट्रल’ श्रेणीत देशात दुसरे स्थान मिळवले होते.

गावात कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षम पद्धत विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक घरासमोर ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन डस्टबिन्स देण्यात आले आहेत. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार केली जाते तर सुका कचरा विक्रीसाठी वापरला जातो. जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते.

गावात १५ सौर दिवे आणि ११ बायोगॅस युनिट्स कार्यरत असून त्यातील दोन थेट शौचालयांशी जोडले आहेत. वृक्षारोपणासाठी प्रत्येक नागरिकाला वाढदिवसाच्या दिवशी झाड भेट दिले जाते. गावात दोन मोफत पीठ गिरण्या कार्यरत असून, कर भरणाऱ्या कुटुंबांना वर्षभर धान्य दळण्यासाठी मोफत सुविधा दिली जाते.

पाटोदा ग्रामपंचायतीने आतापर्यंत ३४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून, त्यातून गावाला राज्य व केंद्र सरकारकडून एकूण २४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पंतप्रधानांकडून झालेल्या गौरवामुळे पाटोदा गाव देशभरातील ग्रामपंचायतींसाठी आदर्श बनले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,684 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क