छत्रपती संभाजीनगर :  वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंग सेवा, या भावनेतून शहरातील वारकरी सेवा चॅरिटेबल फाउंडेशन मागील १८ वर्षांपासून निस्वार्थ सेवा देत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा रविवारी (२९ जून) पाटीदार भवनात पार पडलेल्या लाडू तयार करण्याच्या कार्यक्रमात तब्बल २१०० भाविकांनी एकत्र येत अवघ्या पाच तासांत १ लाख ९ हजार लाडूंची निर्मिती केली.

हे लाडू ४ जुलै रोजी पंढरपूरला नेण्यात येणार आहेत, जेथे प्रथम विठ्ठलाला नैवेद्य दाखवला जाईल आणि नंतर वारीत सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांना प्रसाद म्हणून वाटण्यात येतील. भक्तिभाव, एकोप्याची भावना आणि सेवाभाव यामुळे हा उपक्रम अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.

या उपक्रमाची सुरुवात संस्थापक मनोज सुर्वे यांनी १८ वर्षांपूर्वी केली होती. केवळ १०० भाविकांच्या सहकार्याने ५ हजार लाडू तयार करण्याचा संकल्प तेव्हा त्यांनी घेतला होता. पण आज हे संख्यात्मक रूपानं लक्षणीय वाढले आहे. “प्रत्येक वारकऱ्याला संभाजीनगरचा प्रसाद मिळावा” ही त्यांची आगामी इच्छा आहे.

लाडूंसाठी १५ दिवसांपासून तयारी सुरू होती. २ हजार किलो शेंगदाणे आणि २ हजार किलो गूळ वापरून हे लाडू पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आले. शेंगदाणे भाजून कूट करण्यात आले आणि त्यात गूळ मिसळून भक्तांनी लाडू बांधले. कार्यक्रमादरम्यान सरला शिंदे यांच्या भक्तिसंगीताच्या सुरांवर भाविकांनी हरखून नाच करत लाडू बनवले.

हा उपक्रम पंढरपूरच्या वारीतील भक्तीसोहळ्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि सामाजिक सहभागाचं एक उत्तम उदाहरण ठरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

556 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क