मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे. १ जुलै २०२५ पासून एसटीतून लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी ही घोषणा केली.
ही योजना १५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी प्रवास करणाऱ्या पूर्ण तिकीटधारक प्रवाशांसाठी लागू असेल. सवलतीच्या तिकीटाचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना अथवा इतर श्रेणीतील प्रवाशांना ही सवलत लागू होणार नाही.
ही सवलत सर्व प्रकारच्या एसटी बसेससाठी (उदा. शिवशाही, आसन, सेमी-लक्झरी इत्यादी) लागू राहणार आहे. तथापि, ही सवलत उन्हाळी सुट्टी, दिवाळी आणि विशेष गर्दीच्या कालावधीत लागू केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही योजना १ जून रोजी एसटीच्या वर्धापनदिनी जाहीर करण्यात आली होती, आणि १ जुलैपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. येत्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या बसेस, तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे – पण फक्त नियमित बसेससाठीच.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दरवाढीच्या काळात ही सवलत मोठा दिलासा ठरणार आहे. “अधिकाधिक प्रवाशांनी योजनेचा लाभ घ्यावा”, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*