छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहातील नऊ अल्पवयीन मुलींच्या पलायनप्रकरणी आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली. मुलींना मानसिक त्रास, भेटीसाठी परकीय पुरुष येणे, तसेच बालगृहातील प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे हे प्रकरण अधिकच गडद झाले आहे. यासंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी गंभीर स्वरूपाची विधाने केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट प्रशासनाला दोषी धरत सांगितले, “या घटनेला जिल्हा विकास बाल अधिकारी पूर्णतः जबाबदार आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.” तसेच त्यांनी बालकल्याण समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत, “या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.
भाजप आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणातील धक्कादायक बाब मांडली की, “शेख नावाचा इसम मुलींना भेटायला येत होता. रक्ताच्या नात्याशिवाय कोणालाही भेटू कसं दिलं गेलं?” असा सवाल उपस्थित केला. तसेच त्यांनी महिला अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली.
राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, “या प्रकारामुळे संबंधित बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश दिले आहेत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिले की, “संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल. उद्या चौकशी समितीचा अहवाल मिळणार असून त्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. हायकोर्ट सुद्धा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.”
या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण यंत्रणेवर सवाल निर्माण झाले असून, आता चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*